धर्माधिकारी दांपत्याविरोधात पोळ कुटुंबियांचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल 

<p>धर्माधिकारी दांपत्याविरोधात पोळ कुटुंबियांचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल </p>

कोल्हापूर – प्रसाद विनायक धर्माधिकारी आणि अश्विनी प्रसाद धर्माधिकारी या दाम्पत्याने मंगळवारपेठ परिसरात कार्यालय  थाटून शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या रक्कमेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी यापूर्वी जुना राजवाडा पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला होता. दरम्यान आज कोल्हापुरातील पोळ कुटुंबियांनी या आर्थिक फसवणूक प्रकरणी धर्माधिकारी दांपत्याच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रार  अर्जात पोळ कुटुंबियांनी म्हटले आहे कि, आरोपी प्रसाद विनायक धर्माधिकारी हा कोट्यवधींचा घोटाळा करून आणि सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून दिनांक 2 मे २०२५ रोजी आपल्या राहत्या घरातून पसार झाला आहे. साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये शहरातील जवळपास सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांवर यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्या. पण नेहमीप्रमाणे बराच गवगवा झाल्यावर थोड्या दिवसानंतर सर्व काही शांत झाले.
यात  पोलिसांनी  कमालीची निराशाजनक कामगिरी केली असल्याचा आरोप पोळ कुटुंबियांनी केला आहे . तपास राहिला बाजूला पण जवळपास वर्षभर पोलिसांनी संबंधितांना अजून अटकही केलेली नाही .हे धक्कादायक आणि संतापजनक बाब असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.. 
या आर्थिक फसवणुकीमध्ये अनेक सर्वसामान्य आणि अक्षरशः हातावर पोट असणारे लोक अडकले आहेत. याच बरोबर ज्यांनी काही कारणांमुळे पोलिसात अद्या तक्रारच दाखल केली नाही आहे अशांचीही संख्या लक्षणीय आहे. एकूण फसवणुकीचा आकडा हा किमान ५ कोटींपर्यंत असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे  सदर व्यक्तीने पसार होण्यापूर्वीच आपले राहते घर (जे मिरजकर तिकटीच्या अत्यंत मोक्याच्या जागी असून त्याची किंमत सुमारे  एक कोटी इतकी आहे) आपल्या एका जवळच्या मित्रास विकले आहे. 
दरम्यान सदर आरोपीची पत्नी अश्विनी प्रसाद धर्माधिकारी ही या केसमध्ये सह आरोपी आहे . त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  आता त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. निदान आता तरी पोलिसांनी जागे होऊन लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.