शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी
कोल्हापूर - राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेमधील रिक्त शिक्षकेत्तर पदावर समायोजन करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी १७ एप्रिल २०२६ रोजी दिले आहेत. ही प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिक्षक भारती पाटील यांना देण्यात आले आहे.
दिनांक १ एप्रिल १९७६ पासून एक लेखनिक आणि एक शिपाई पद शासनाने मंजूर केले आहे. त्यानंतरही वेळोवेळी शासनाने आदेश काढून या पदांना मंजूरी दिली आहे. तसेच आर.टी.ई. कायद्यात कुठेही खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे अतिरिक्त ठरवावीत असे नमूद नाही, त्यामुळे हा निर्णय खासगी प्राथमिक शाळांवर अन्याय करणारा असून या विरोधात याचिका दाखल असल्याची माहिती महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे यांनी दिली आहे.
यावेळी महासंघाचे सल्लागार एम. डी. पाटील, विभागीय शिक्षकेत्तर प्रमुख राजू पांढरबळे, जिल्हाध्यक्ष सागर जाधव, शहराध्यक्ष अर्जुन चाफोडीकर, जितेंद्र पाटील, सुचित्रा अग्निहोत्री, गीता चव्हाण, भारती पाटील, संजय चव्हाण, फिरोज नायकवडी, आनंदा पोवार, सुर्यकांत चौगुले आदी उपस्थिती होते.