करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रथाची चांदी कोठे आहे : नागरिक कृती समितीचा देवस्थान समितीला सवाल
कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा परंपरागत चैत्र पौर्णिमेला मोठा रथोत्सव असतो. रथातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. याचं रथाला भाविकांनी श्रद्धेने शेकडो किलो चांदी अर्पण केली होती. या अर्पण केलेल्या चांदीतून संपूर्ण रथ सजवला गेला होता, पण दोन वर्षापूर्वी तो रथ खराब झाल्यामुळे संपूर्ण रथ नवीन लाकडापासून पुन्हा तयार केला गेला आहे. याच नवीन रथातून आज अखेर दोन रथोत्सव संपन्न झाले पण भाविकांनी श्रद्धेपोटी अंबाबाई चरणी अर्पण केलेली चांदी कोठे आहे ?, त्या चांदीचे काय केले, याचे उत्तर देवस्थान समितीने द्यावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
या चांदीच्या मागे भाविकांच्या भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे याचा जाहीर खुलासा भाविकांसमोर तातडीने जाहीर करावा, यंदाच्या दसरा उत्सवापर्यंत भाविकांनी रथासाठी अर्पण केलेली सर्व चांदी नव्या रथाच्या सजावटीसाठी वापरून रथ मढवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर अशोक पोवार ,रमेश मोरे, अजित सासणे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, अँड. प्रतापराव जाधव, लहुजी शिंदे, सदानंद सुर्वे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, महेश जाधव, प्रा.शिवाजी पाटील, विनोद डूणूंग, पै .विष्णू जोशीलकर आदींच्या सह्या आहेत.