"प्राण गेला तरी चालेल, पण इंचभरही जमीन देणार नाही"; करकंबमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

<p>"प्राण गेला तरी चालेल, पण इंचभरही जमीन देणार नाही"; करकंबमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार</p>

करकंब (पंढरपूर) : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित सुधारित आराखड्याविरोधात पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली. हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत, "प्राण गेला तरी चालेल, पण इंचभरही जमीन देणार नाही," असा निर्धार व्यक्त केला. सुपीक शेती, द्राक्षबागा आणि फळबागा उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत शेतकऱ्यांच्या लढ्याला सर्वतोपरी पाठिंबा देण्याची ग्वाही नेत्यांनी दिली.

मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारला थेट आव्हान देत, "सरकारमध्ये दम असेल तर दिवसा मोजणी करून दाखवावी. पहाटे पाच वाजता येऊन मोजणी करण्याचे भ्याड उद्योग कशाला करता? ही केवळ जमिनीची नव्हे, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. आमची जमीन या महामार्गात जात नसली तरी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. वेळ पडली तर गोळ्याही खाऊ, पण शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही," असे ठामपणे सांगितले.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला पूर्णपणे अव्यवहार्य ठरवत सरकारवर गंभीर आरोप केले. "या महामार्गाची मागणी कोणत्याही शेतकऱ्याने केलेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्याऐवजी सरकारला शक्तीपीठ महामार्गाचेच स्वप्न पडत आहे. केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. एजंटांमार्फत शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत राहू," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारच्या विकासाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "महामार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा राज्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देणे अधिक महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले.

द्राक्ष बागायतदार संघटनेचे मारुती चव्हाण यांनी या महामार्गामुळे द्राक्ष, बेदाणा आणि फळबागांवर आधारित हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली. तर गिरीश फोंडे यांनी प्रशासन शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून मोजणीसाठी तयार करत असल्याचा आरोप केला. मोजणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर सरकारचा डोळा असल्याचा दावा करत, कोकणातील खनिज संपत्तीवर लक्ष ठेवून हा महामार्ग राबवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. मेळाव्यात महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाल्यास तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला. पोलीस, महसूल प्रशासन किंवा मोजणी अधिकारी जबरदस्तीने मोजणीसाठी आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा एकमुखी निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

यावेळी के. के. पाटील, वसंत अण्णा देशमुख, प्रकाश पाटील, भारत शिंदे, दत्ता मगर, बाळासो पाटील, शिवाजी पाटील, निशांत पाटील, दीपक देशमुख, विनंती कुलकर्णी, शरद पांढरे, सचिन जगताप, मारुती चव्हाण, संदीप पाटील, नितीन शिंदे, महेश व्यवहारे, सचिन हराळे, अभिजीत हराळे, बाळू अण्णा व्यवहारे, राजकुमार हराळे, रंजीत व्यवहारे यांच्यासह शेकडो शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.