दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही, आम्ही बुळगे नाही...: क्षीरसागर यांना काँग्रेसचे प्रत्युत्तर

<p>दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही, आम्ही बुळगे नाही...: क्षीरसागर यांना काँग्रेसचे प्रत्युत्तर</p>

कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये आमदार सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. यावर काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीच्यावतीने पत्रकार बैठक घेऊन याबाबत खुलासा करण्यात आला.

यावेळी बोलताना भारती पोवार यांनी, व्हायरल व्हिडिओचा आणि आमदार सतेज पाटील यांचा काहीही संबंध नाही. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही, आम्ही बुळगे नाही आहोत, अशा शब्दात क्षीरसागर यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढ्याला तयार रहावे, असा इशारा सुद्धा देण्यात आला.

महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी, असे व्हिडीओ फक्त राजेश क्षीरसागर यांचेच का व्हायरल होतात, असा सवाल केला. असा भ्रष्ट्राचार होत असेल तर हे उघडे पाडणे हे विरोधी नेत्यांचे काम असते. जनतेच्या पैशाचा हिशोब मिळालाच पाहिजे. हे सोडून आमदार सतेज पाटील यांचे नाव सातत्याने घेऊन हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महायुतीने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तुमच्या घरात भेदी कुणी आहे का ? हे तपासून पहा आणि मग आमच्या नेत्यांचे नाव घ्या. जो चुका करणार त्याला भोगावे लागणार, असा इशारा लाटकर यांनी दिला.

सुनील मोदी यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने या व्हिडिओच्या व्हायरलची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र सातत्याने आमदार सतेज पाटील यांचे नाव घेऊन विषय भरकटवला जात आहेत. उद्या विधानसभेत यावर ठाकरे गटाकडून स्थगन प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांनी हे व्हिडिओ उपलब्ध करून दिले, त्यांच्या जीवाला सध्या धोका आहे, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हा व्हिडीओ ए आय नं बनवलेला नाही, असा दावा मोदी यांनी केला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, स्वीकृत नगरसेवक राहुल माने, नगरसेवक अमर समर्थ, अर्जुन माने, विनायक कारंडे, शिवानंद बनछोडे यांच्यासह नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.