...अन्यथा न्यायालयात दाद मागणार : क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचा इशारा

<p>...अन्यथा न्यायालयात दाद मागणार : क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचा इशारा</p>

कोल्हापूर -  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये २०१७ ते २०२१ या दरम्यान विविध मार्गाने गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करण्यात आल्याचा, आरोप क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला आहे.

देवीला दान केलेल्या साड्या, पुराच्या काळामध्ये जनावरांना देण्यात आलेले प्रोटीन युक्त अन्न, वाटप करण्यात आलेली भांडी, स्वतःची जागा असताना अनेक ठिकाणी भाड्याने जागा घेतली गेली,  देवस्थान समितीची जमीन मोजण्यासाठी सरकारी व्यवस्था असताना सुद्धा खासगी कंपनीला सात कोटी अदा करण्यात आले, अशा विविध माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यामध्ये तत्कालीन अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह सदस्यांचा सहभाग असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. या विरोधात त्यावेळी विविध संघटनांनी आवाज उठवला होता. तक्रार देण्यात आली होती. या संबंधी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शन आले होते. याचा सुधारित कारवाईचा प्रस्ताव आणि दोषारोपपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी विधी आणि न्याय खात्याकडे अंतिम कारवाईसाठी पाठवले आहे. त्यामुळे ही कारवाई अंतिम टप्प्यात आल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि श्री अंबाबाई देवीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. जर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

 या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा. तत्कालीन समितीमध्ये ज्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार झालाय, दोषारोपपत्र तयार झाला आहे, अशांना पुन्हा देवस्थान समितीवर घेण्यात येऊ नये, त्यांना कोणत्याच महामंडळावर घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होत नाही तोपर्यंत देवस्थान समितीत नव्याने नियुक्ती करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेला संघटनेचे सौरभ पोवार, विपुल घाटगे आदी उपस्थित होते.