पुण्याची जमावबंदी म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर : खा. सुप्रिया सुळेंचा संताप 

<p>पुण्याची जमावबंदी म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर : खा. सुप्रिया सुळेंचा संताप </p>

पुणे – पुणे शहरात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. यावर खा. सुप्रिया सुळे यांनी, पुण्याची जमावबंदी म्हणजे  आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार असल्याचे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 
खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि, पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?
 एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलिसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत ? 
पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ?, असा सवाल त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे.