‘शिवराज्याभिषेक सोहळा केवळ लोकोत्सव नव्हे तर...’: संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन
कोल्हापूर – गेल्या २० वर्षापासून सुरू असणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला देशभरातून शिवभक्त रायगडावर मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे हा सोहळा केवळ लोकोत्सव नव्हे तर प्लास्टिकमुक्त करूया, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. सोहळ्याच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
६ जून रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भवानी मंडप येथे तुळजाभवानी मंदिरात रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षीच्या सोहळ्यासाठी ४० वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
शुक्रवारी ५ जून रोजी दुपारी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर गड पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी युध्दकलेची प्रात्यक्षिके, ढोल वादन, लेझीम पथकांचे प्रदर्शन आणि रात्री गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ६ जून रोजी सकाळी सात वाजता ध्वजपूजन त्यानंतर शाहिरी कार्यक्रम, सकाळी साडे नऊ वाजता पालखी मिरवणूक त्यानंतर शिवमूर्तीस अभिषेक आणि सिंहासना रोड शिवमुर्ती सुवर्णमुद्रांचा अभिषेक घालून राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.
यावेळी संयोगिताराजे छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, फत्तेसिंह सावंत, संजय पवार, नगरसेवक विनायक फाळके, आझाद नायकवडी, जीवन साळोखे उपस्थित होते.