अनियमित पाणी पुरवठ्यामुळे तळंदगेकरांचा संताप ; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला घेराओ

<p>अनियमित पाणी पुरवठ्यामुळे तळंदगेकरांचा संताप ; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला घेराओ</p>

पट्टणकोडोली - हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने  नागरिकांनी आज ग्रामपंचायतीला घेराओ घातला आहे. वीस ते पंचवीस दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.


नागरिकांनी प्रभारी सरपंच संध्या कांबळे व ग्रामपंचायत अधिकारी एम. के. कांबळे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु  ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने नागरिकांचा रोष अधिक वाढला. 
दरम्यान, हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. काही वेळाने ग्रामपंचायत अधिकारी एम. के. कांबळे उपस्थित झाल्यानंतर प्रभारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आंदोलनकर्त्या नागरिकांची संयुक्त बैठक झाली. नागरिकांनी नियमित पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी परिस्थिती तणावपूर्ण होत असताना पोलिस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, हवालदार एकनाथ भांगरे, युवराज कांबळे आदींनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एम. के. कांबळे यांनी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन आठ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात वीरेंद्र रुग्णे, रंगराव धनगर, दीपक सलगर, प्रमोद वाघमोडे, सौरभ लंगोटे, रोहित देवकाते, सुशांत येताळे, अनिकेत सोनवणे, सोमनाथ शिरोळे, महेश चौगुले, अमित वाघमोडे, आकाश येताळे, सलीम मुल्लानी, धनाजी पोळ आदी सहभागी झाले होते.