शेततळ्याच्या शांत पाण्यात काळाने घेतले तीन चिमुकल्यांचे बळी
किणी-हुंदळेवाडीत हृदयद्रावक घटना; गावभर शोककळा, पोस्टमार्टम सुविधेअभावी संताप
चंदगड : उन्हाळ्याच्या सुट्टीतील खेळ, निरागस हास्य आणि निष्पाप बालमैत्री... पण सोमवारी दुपारच्या एका क्षणाने किणी-हुंदळेवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. गावाजवळील शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या घटनेनंतर गावातील प्रत्येक घरातून हंबरडा फुटत असून वातावरण शोकमग्न झाले आहे.
किणी-हुंदळेवाडी परिसरातील शेततळ्याकाठी दुपारी काही मुले खेळत होती. सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास शेताच्या दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीला तलावाजवळ एक लहान मुलगा एकटाच उभा असल्याचे दिसले. संशय आल्याने त्याने विचारणा केली असता, “आमच्या ताई पोहत आहेत,” असे त्या निष्पाप मुलाने सांगितले. मात्र काहीतरी अनर्थ घडल्याची चाहूल लागताच संबंधित व्यक्तीने क्षणाचाही विलंब न करता शेततळ्यात उडी घेतली.
पाण्यात शोध घेत असताना तीन चिमुकल्या मुली बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या. ही माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनी तिन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत काळाने त्यांना हिरावून नेले होते.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलींची नावे धनुष्का पुंडलिक सांबरेकर(हुंदळेवाडी), स्वराली जयवंत नाईक (होसुर) आणि रिया चंद्रकांत सांबरेकर(हुंदळेवाडी) अशी आहेत. तिन्ही मुलींच्या अकाली निधनाने गावातील वातावरण शोकमग्न झाले असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले.
दरम्यान, या घटनेनंतर कोवाड परिसरातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध नसल्याने तिन्ही मुलींचे मृतदेह तब्बल ३० किलोमीटर दूर असलेल्या चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे हलवावे लागले. त्यामुळे दु:खात असलेल्या नातेवाईकांना मानसिक, आर्थिक आणि वेळेचा मोठा त्रास सहन करावा लागला.
“कोवाडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी पोस्टमार्टम सुविधा असती, तर अशा वेळी कुटुंबीयांची फरफट झाली नसती,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने कोवाड येथे शवविच्छेदन सुविधा सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.