सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनवरून वाद...

<p>सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनवरून वाद...</p>

कोल्हापूर - जिल्हा शल्यचिकित्सक हे पद आरोग्य विभागाच्या अखत्यारीत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सद्या जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉक्टर सरिता थोरात या कार्यरत आहेत. तर शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. सदानंद भिसे हे कार्यभार सांभाळत आहेत. गेली अनेक वर्षे जिल्हा शल्यचिकित्सक हे सीपीआर मधील जुन्या इमारतीतील एका केबिन मधून त्यांचा कार्यभार सांभाळतात. सद्या सीपीआरच्या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात यांच्या केबिनचीही डागडुजी करण्यात आली आहे. आता डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर अचानक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सीपीआरमधील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनला वैद्यकीय अधीक्षकांचा फलक लावला आहे. तसेच मुख्य दरवाजाला कुलूप लावले आहे. यामुळे सीपीआरमधील वातावरण तापले आहे. दरम्यान या संदर्भात शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर भिसे यांच्याशी संपर्क साधला असता सन २००७ च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार कोल्हापूरख लातूर, अकोला इथल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय महाविद्यालयांच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या वापरा संदर्भातील सर्व अधिकार संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्याचे सांगितले. शिवाय नूतनीकरण केलेल्या सीपीआरच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटनापूर्वी केबिनचा वापर होऊ नये. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांच्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी असे सांगत भिसे यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समन्वयातून यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.