...तर एसटी महामंडळ जगवण्यासाठी प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य : मंत्री प्रताप सरनाईकांचा संकेत
मुंबई – देशात पेट्रोल – डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. या दर वाढीचा फटका आता लालपरीलाही बसणार असल्याचे संकेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने महामंडळाला मदतीचा हात पुढे केला नाही तर एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘प्रत्येक आगारातून पाच लिटर डिझेल बचतीच्या सूचना दिल्या आहेत. जे आगार जास्त डिझेल बचत करेल त्यांना बक्षीस देण्यात येईल’, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे. देशात सातत्याने होत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्याभरात दोनवेळा डिझेलचे दर वाढले असून, सध्या डिझेल ९१ रुपयांच्या पार गेले आहे. डिझेल प्रतिलिटर ३ रुपये १० पैशांनी महागल्यामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे १२४ ते १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळ आधीच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. एकट्या एप्रिल २०२६ या एका महिन्यात महामंडळाला जवळपास ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. महागाई अशाच पद्धतीने वाढत राहिली, तर एसटी महामंडळ जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे संकेत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आहेत.