गोकुळ संघ निवडणुकीची रणधुमाळी सुरु : आ. सतेज पाटील यांच्याकडून पॅनेलच्या नावाची घोषणा...
कोल्हापूर - गोकुळ दुध संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाल्याची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने आज आ. सतेज पाटील यांनी पत्रक काढून पॅनेलच्या नावाची घोषणा केली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असे नाव पॅनेलचे नाव आहे. त्याबाबतचे पत्रक संस्था प्रतिनिधींना देण्यास सुरवात केली आहे.
आ. सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे कि, गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या पाच वर्षात गोकुळच्या माध्यमातून साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मी घेतली आहे. ग्रामीण भागातील माता-भगिनी आणि शेतकरी यांचे अर्थकारण गोकुळवर अवलंबून आहे. अशा वेळी गोकुळ दूध संघाची सत्ता एक विचाराने काम करणाऱ्या चांगल्या लोकांच्या हाती असणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी दूध संस्थेच्या माध्यमातून योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करणे, या ठरावधारकाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये भविष्य काळात गोकुळ टिकला पाहिजे, यादृष्टीने चांगली भूमिका घेणे महत्वाचे आहे.
पक्षीय राजकारणात न अडकता गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण गेले तीन महिने महायुतीमध्ये सुरु असलेला वाद आपण सर्वजण अनुभवत आहोत. त्यामुळे गोकुळच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे पक्षीय भूमिकेतून न पाहता लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची ही व्यवस्था टिकली पाहिजे, अशा पद्धतीने याकडे पाहणे आवश्यक आहे. म्हणून अशी व्यापक भूमिका असणाऱ्या सभासदाच्या नावे आपल्या संस्थेचा ठराव करावा, ही विनंती मी आपल्याला करतो. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेऊन मी अनेक लढायांना आपल्यासारख्या स्वाभिमानी सभासदांच्या पाठबळावर सामोरा गेलो आहे. यावेळी सुद्धा आपण सर्वजण मला साथ द्याल, असा विश्वास वाटतो.