इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांचे आंदोलन स्थगित... आठ जूनला होणार बैठक

<p>इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांचे आंदोलन स्थगित... आठ जूनला होणार बैठक</p>

इचलकरंजी - शहरातील खर्चीवाले यंत्रमाग धारकांनी मजुरी वाढ मिळावी, यासाठी गेल्या तेवीस दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. याबाबत बैठका होवूनही कोणताच तोडगा निघाला नाही, अखेर सोमवारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी कार्यालयात खर्चीवाले यंत्रमागधारक आणि ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन महिनाभर स्थगित करण्याची मागणी केली. मात्र याला खर्चीवाले यंत्रमाधारकांनी नकार देत मजुरीवाढीचा आजच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ तापले होते. त्यानंतर माजी आमदार हाळवणकर यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. हाळवणकर यांच्या विनंतीनंतर खर्चीवाले यंत्रमागधारक आंदोलन पुढील पंधरा दिवस स्थगित ठेवण्यास तयार झाले. तसेच आठ जूनला होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रांताधिकारी दिपक शिंदे यांनी ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आठ जून च्या बैठकीत सकारात्मक भूमिका मांडावी जो निर्णय होईल तो किमान पुढील तीन वर्षासाठी लागू रहावा, त्या काळात पुन्हा आंदोलनाची वेळ येवू देवू नये, अशा सूचना केल्या. या बैठकीला उपमहापौर अनिल डाळ्या शहाजी भोसले, पुंडलिक जाधव यांच्यासह खर्चीवाले यंत्रमागधारक आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.