मुरगुडमध्ये सूर्यासिद्ध देवाचा भंडारा उत्साहात...
कोल्हापूर - मुरगुड शहराच्या मध्यभागी प्राचीन सूर्यासिद्ध मंदिर आहे. सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सूर्यासिद्ध मंदिराला मुरगुड परिसरात विशेष धार्मिक महत्त्व आहे. पूर्वी गावाच्या वेशीबाहेर असलेले हे मंदिर आता शहराच्या मध्यवस्तीत आले असून दर मंगळवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या प्राचीन सूर्यासिद्ध देवाच्या भंडारा उत्सवाला यंदा भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली आहे.
पुजारी विनायक मेटकर यांच्या घरातून देवाची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तुकाराम चौकातील मंदिरात आणण्यात आली. ढोल, कैताळ आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी मार्गावर भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर धार्मिक विधी, आरती आणि आतषबाजी करण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेनिमित्त मुरगुडसह परिसरातील हजारो नागरिकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती.