मुरगुडमध्ये 'ब्रह्मज्ञानयोगी' ग्रंथाचे मोफत वितरण...
कोल्हापूर - मुरगुडमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या जीवनचरित्र आणि तत्त्वज्ञानावर आधारित 'ब्रह्मज्ञानयोगी' या चरित्रपर ग्रंथाचे मुरगुडमधील महालक्ष्मी कॉलनी येथे मोफत वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम प्रवीण दाभोळे कुटुंबीयांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हरिभक्त परायण नामदेव राऊत महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर हरि भक्त परायण पांडुरंग बुवा उपलाने महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 'ब्रह्मज्ञानयोगी' ग्रंथाचे पूजन हरि भक्त परायण बाळकृष्ण गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ वितरण सोहळ्यानिमित्त हरि भक्त परायण अशोकराव कौलकर यांनी ग्रंथातील एका ओवीचे निरूपण केले. हरि भक्त परायण प्रा. बाळकृष्ण चौगुले यांनी ग्रंथाचा परिचय करून दिला. यावेळी ग्रंथाचे लेखक राम तोरसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निमित्ताने मुरगुड आणि परिसरातील सुमारे ३० प्रवचनकार आणि कीर्तनकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवीण दाभोळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा शिवगड ट्रस्टचे सचिव उदय खांडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राम तोरसे यांनी, मुरगुडचे सेवानिवृत्त शिक्षक हेमंत पोतदार यांनी डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे चरित्र लिहण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्या परवानगीने हा ग्रंथ साकारल्याचे सांगितले. यावेळी हरि भक्त परायण बळी पाटील शिरसे, शीतल तोरसे, अक्काताई चौगुले, विनय कुलकर्णी, कबीर पायी दिंडीचे सहकारी, विठ्ठल मंदिर मुरगुडचे सदस्य, शिवगड ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांसह मुरगुड आणि परिसरातील वारकरी प्रवचनकार, कीर्तनकार तसेच टाळकरी उपस्थित होते.