पाण्यासाठी इचलकरंजीत शिव-शाहू आघाडीचे मडकी फोड आंदोलन

<p>पाण्यासाठी इचलकरंजीत शिव-शाहू आघाडीचे मडकी फोड आंदोलन</p>

इचलकरंजी - महानगरपालिकेत आज शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेपूर्वीच शिव-शाहू विकास आघाडीच्यावतीने महानगरपालिका प्रांगणात जोरदार निदर्शने करण्यात आली. रखडलेल्या सुळकुड आणि वारणा पाणी योजनांबाबत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करत आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर, खासदार, आमदार आणि सत्ताधारी नगरसेवकांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

हातात मातीची मडकी घेऊन आंदोलनकर्त्यांनी सुळकुड योजना, वारणा योजना झाली बेपत्ता, खासदार-आमदार महापौर-उपमहापौर झाले बेपत्ता अशा घोषणा देत महानगरपालिका परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मडकी फोडून सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असताना, निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. शिव-शाहू विकास आघाडीच्या १७ नगरसेवकांनी गळ्यात सुळकुड योजना मंजूर झाली पाहिजे, वारणा योजना तातडीने पूर्ण करा, अशा मागण्यांचे पोस्टर लावून विरोधी पक्षनेते सभागृहापर्यंत मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी सभागृहात प्रवेश केला. पोस्टर गळ्यात घालूनच नगरसेवक सभेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे सभागृहातील वातावरणही चांगलंच तापल्याचे पहायला मिळाले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी माजी आमदारांसह सत्ताधाऱ्यांवर टीका करत, गेल्या २५ वर्षांपासून इचलकरंजी शहरात पाणी प्रश्नावर केवळ राजकारण होत असल्याचा आरोप केला. शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सुळकुड आणि वारणा पाणी योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. जनतेची पाण्यासाठी सातत्याने फसवणूक झाली असून, येणाऱ्या काळात जनता याचा योग्य तो हिशेब करेल, असा इशाराही यावेळी आघाडीच्या नगरसेवकांनी दिला आहे.

या आंदोलनात शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.