आ.सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न...

<p>आ.सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न...</p>

मुंबई - कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या प्रदुषणात वाढ झाल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि नदीकाठावरील गावांमधील सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने पंचगंगा नदीतील पाण्याच्या प्रदुषणात वाढ झाली असून त्यामध्ये अनेक ठिकाणी जलपर्णी वाढली आहेत.  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले असूनही सर्व सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया केली जात नसल्याने नदीचे पाणी काळे आणि दुर्गंधीयुक्त झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांसह कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरांतील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे खरंय का? असल्यास, शासनाने नदीतील जलपर्णी काढून तसेच पाण्याचे जलशुध्दीकरण करुन नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोणती कार्यवाही केली ? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.

यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका तसेच नदीकाठावरील गावांमधील घरगुती सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्याने जलपर्णी वाढल्याची कबुली दिली. तथापि मार्च ते मे, २०२६ या दरम्यान औद्योगिक वसाहतीमधून पंचगंगा नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असल्याबाबत कोणतीही तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सद्यःस्थितीत पंचगंगा नदी खोऱ्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दररोज २१ कोटी ४१ लाख ९० हजार लिटर इतक्या घरगुती सांडपाण्याची निर्मिती होत असून त्यापैकी १४ कोटी ४७ लाख लिटर घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते आणि उर्वरित ६ कोटी ९५ लाख ९० हजार लिटर घरगुती सांडपाणी दररोज विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत मिसळते. पंचगंगा नदी खोऱ्यातील शिरोळ नगरपरिषद, कुरुंदवाड नगरपरिषद, हुपरी नगरपरिषद आणि हातकणंगले नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निर्माण होणाऱ्या साडे पाच दशलक्ष लिटर इतक्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता स्वच्छ भारत मिशन योजनेतून सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि कोल्हापूर तसेच इचलकरंजी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पंचगंगा नदी प्रदूषणामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणतेही जलजन्य आजार पसरले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.