सत्तेचा माज सोडा; जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या" – मुख्यमंत्री, राज्य व केंद्र सरकारवर राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरापासून 'मिसिंग लिंक'पर्यंत सरकारला राज ठाकरेंचे थेट सवाल
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी विरोधकांवर टीका आणि धमकीची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे म्हटले. मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, "भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. आज सत्ता आहे, उद्या विरोधी बाकावरही बसावे लागू शकते. त्यामुळे विरोधकांनी प्रश्न विचारले की त्याला राजकारण म्हणू नका. मुख्यमंत्री विधानसभेत ‘बघून घेऊ’ अशी भाषा वापरतात, ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही."
‘मिसिंग लिंक’ प्रकरणावरून सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी विरोधकांवर महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. "जनतेने रस्ते, पायाभूत सुविधा किंवा इतर प्रश्नांबाबत आवाज उठवला तर तो महाराष्ट्राचा अपमान कसा होतो? विरोधात असताना आंदोलने करणारे सत्तेत आल्यानंतर प्रश्न विचारणाऱ्यांनाच राजकारणाचा आरोप करतात," असा टोला त्यांनी लगावला.
राम मंदिरातील चोरीच्या मुद्द्यावरही त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "राम मंदिर प्रत्येक हिंदूच्या श्रद्धेचे केंद्र आहे. तिथे भक्तांनी दिलेल्या दानाची चोरी होत असेल, तर त्यावर प्रश्न विचारणे धर्माचा अपमान कसा होऊ शकतो? मंदिराच्या विश्वस्त मंडळात केंद्र सरकारने नियुक्त केलेले सदस्य आहेत. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे," असे ते म्हणाले.
भाजपवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, विरोधात असताना सत्ताधाऱ्यांवर कोणतेही आरोप करणारे आज स्वतःवर टीका झाली की अस्वस्थ होत आहेत. "गेल्या अनेक वर्षांत विरोधकांविरोधात अपमानास्पद भाषा आणि सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून झाले. आता त्याच पद्धतीने प्रश्न विचारले जात असल्याने त्यांना त्रास होत आहे," असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री विधानसभेत काही वेळ हिंदीत बोलल्याचाही त्यांनी समाचार घेतला. "महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी आमदारांसमोर हिंदीत बोलण्याची गरज काय होती? हे भाषण नेमके कुणासाठी होते?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपमधील अंतर्गत घडामोडींवरही सूचक टिप्पणी केली.
राज ठाकरे यांच्या या टीकेमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.