चंदगड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना टाळे; नागरिकांचे हाल

जक्कनहट्टी, होसूर, किटवाड ग्रामपंचायतीचा समावेश; ग्रामसेवक व कर्मचारी कुठे आहेत? नागरिकांचा सवाल

<p>चंदगड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना टाळे; नागरिकांचे हाल</p>

चंदगड : चंदगड तालुक्यातील जक्कनहट्टी, होसूर, किटवाड यासह बहुतांश ग्रामपंचायत कार्यालयांना टाळे लागल्याचे चित्र आज समोर आले आहे. नियमित कामकाज होत नसल्याने नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गावपातळीवरील प्रशासनाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींचे कामकाज विस्कळीत झाल्याने जन्म, मृत्यू, विवाह दाखले, विविध प्रमाणपत्रे, कर भरणा, परवानग्या तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित कामे प्रलंबित राहत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, बँक व्यवहार आणि इतर महत्त्वाची प्रशासकीय कामे खोळंबत आहेत.

अनेक ग्रामपंचायत कार्यालये बंद असल्याचे पाहून ग्रामस्थांकडून "नेमके ग्रामसेवक कुठे आहेत?", "ग्रामपंचायतीतील कर्मचारी कार्यालयात का उपलब्ध नसतात?" असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यालयात येऊनही कुलूप पाहावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचीपंचायत समिती आणि जिल्हा प्रशासन विभागाने तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायतींमधील नियमित कामकाज सुरळीत करावे, आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता संबंधिताना सूचना देण्यात येईल असं सांगितलं. त्यानंतर असा प्रकार आढळलयास कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं.