पावसामुळे चक्रेश्वरवाडीतील शाळेच्या स्वच्छतागृहाची भिंत ढासळली... विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

<p>पावसामुळे चक्रेश्वरवाडीतील शाळेच्या स्वच्छतागृहाची भिंत ढासळली... विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची शाळा आहे. शाळेला जोडून अंगणवाडीची इमारत आणि बायोगॅस आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या षटकोनी वर्ग खोलीवरील पत्रे उडाले.  तसेच स्वच्छता गृहाची भिंत कोसळून शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. अंगणवाडी शाळेची बायोगॅस यंत्रणाही पडून निकामी झाली आहे.

सुदैवाने ही घटना शाळा सुरू नसताना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पत्रे, स्वच्छता गृहाची भिंत आणि बायोगॅस पडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तातडीने दुरुस्तीची गरज आहे. संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मंजूर करावी, तसेच शाळेच्या दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर हाती घ्यावीत, अशी मागणी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. तसेच शाळेत असणाऱ्या स्वच्छता गृहांची स्वच्छता न केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वछतेकडे शाळा समितीसह, ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.