शक्तीपीठ महामार्गाविरोधात आषाढीत एल्गार; १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची जाहीर सभा, 'सद्बुद्धी यात्रा'ची घोषणा
कोल्हापूर : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप देण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने घेतला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येत्या १८ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथील वाखरी मैदानावर सकाळी ११ वाजता १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा होणार असून, त्यानंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर अशी हजारो शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा' काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. "शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिरावून घेणारा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने तातडीने रद्द करावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निर्णय घेण्याची सद्बुद्धी पांडुरंगाने द्यावी," अशी प्रार्थना शेतकरी विठ्ठल चरणी करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांनी आरोप केला की, शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक जमीन संपादित होणार आहे. त्यामुळे लाखो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. "या महामार्गाची कोणतीही गरज नसताना केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या हितासाठी हा प्रकल्प राबविला जात असून, यात हजारो कोटींचा आर्थिक व्यवहार असल्याचा संशय आहे," असा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी विविध जिल्ह्यांत मोर्चे, धरणे, ग्रामसभांमधील ठराव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महामार्गाला विरोध दर्शविण्यात आला आहे. मात्र, सरकारने अद्याप प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केलेली नसल्याने आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
"हा लढा केवळ जमिनीचा नाही, तर शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचविण्याचा आहे," असे सांगत १३ जिल्ह्यांतील शेतकरी, महिला, युवक आणि कष्टकरी यांनी १८ जुलै रोजी वाखरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने राजू शेट्टी यांनी केले.