“माझ्या वडिलांना पक्षाने...”: सचिन अहिरेंच्या कन्येची बंडखोरीवर पोस्ट
मुंबई – ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आ. सचिन अहिर यांच्या कन्येने वडिलांनी केलेल्या बंडखोरीवर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
किरण अहिर यांनी वडिलांची बाजू मांडताना म्हटले आहे कि, “माझ्या वडिलांना पक्षाने भरपूर काही दिलं, तरी त्यांनी पक्ष का बदलला? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, पदे ही मेहेरबानी म्हणून मिळत नाहीत, ती कष्टाने आणि कर्तृत्वाने कमवावी लागतात”
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या वडिलांबद्दल अनेक आरोप आणि द्वेषयुक्त संदेश मी पाहत आहे. आज मी येथे कोणाशीही वाद घालण्यासाठी किंवा कोणाविरुद्ध बोलण्यासाठी आलेली नाही. मी फक्त एक मुलगी म्हणून, लहानपणापासून ज्या माणसाला अत्यंत जवळून पाहिले आहे, त्या वडिलांबद्दलचा माझा दृष्टिकोन मांडत आहे.”
‘जर त्यांना आधीच इतके काही दिले गेले होते, तर त्यांनी पक्ष का बदलला?’ याचे उत्तर देण्यापूर्वी, राजकारणाचा खरा हेतू फक्त पद किंवा अधिकार मिळवणे नसून जनतेची सेवा करणं हा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले, मी या गोष्टीचा पूर्ण आदर करते. पण यासोबतच दुसरा एक प्रश्नही विचारला गेला पाहिजे. जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसते, त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कठोर परिश्रम केलं नसतं, तर त्यांच्यावर एवढ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या असत्या का?”
माझ्या मते, माझ्या वडिलांचा निर्णय कधीही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हता. तो एक अत्यंत कठीण राजकीय निर्णय होता, जो या विश्वासाने घेतला गेला की त्यांचे खरे कर्तव्य हे तिथेच आहे जिथून ते जनतेची जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम सेवा करू शकतील. कारण सरतेशेवटी, राजकीय पक्ष हे केवळ एक माध्यम असतं. अंतिम ध्येय हे नेहमीच जनता आणि लोकसेवा हेच असायला हवं.