कोल्हापुरातील ‘या’ माजी आमदारांच्या गाडीने म्हशीला दिली धडक...म्हशीचे दोन्ही पाय झाले निकामी
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील टोप - संभापूर येथे शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या तथा माजी आमदार जयश्री जाधव यांच्या गाडीने काल सायंकाळी एका म्हशीला धडक दिली आहे. कोल्हापूरहून वडगावला जात असताना ही सर्व घटना घडली आहे. या धडकेमुळे म्हशीचे पुढील दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तसेच या म्हशीच्या पोटात सहा महिन्याचे रेडकू असल्याने तेही दगावले आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी वडगाव पोलिस दाखल झाले होते, अशी माहिती मिळत आहे.
टोप - संभापूर येथील लक्ष्मण यशवंत कारंडे यांची ती म्हैस असून त्यांच्या कुटुंबियांकडून दु :ख व्यक्त केले जात आहे. झालेल्या या धडकेमुळे शेतकऱ्यांचे दीड लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना ही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता होवू लागली आहे.