नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकाची भूमिका सुलभकाची : डॉ.कमलादेवी आवटे
कोल्हापूर - नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकाची भूमिका सुलभकाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालिका डॉ.कमलादेवी आवटे यांनी केले. त्या कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजित तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण समारोप प्रसंगी बोलत होत्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या यातील इयत्ता दुसरी, तिसरी आणि सहावी या वर्गांसाठी नवीन पाठ्यपुस्तक आले आहेत. याचे प्रशिक्षण राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वि. स. खांडेकर विद्यालयात प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. याच्या समारोप कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी, विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनाला प्रेरणा देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण, क्षमताधिष्ठीत आणि सर्वांगीण विकास साध्य करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई यांनी, कोल्हापूर जिल्ह्याने नास, परख आणि पीजीआय मध्ये राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जिल्ह्याने आपली गुणवत्ता सिद्ध केल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालिका वर्षाराणी भोपळे, प्रशिक्षण समन्वयक श्रावण कोकितकर, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता वृषाली गायकवाड, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, प्रशिक्षण मार्गदर्शक सारिका पाटील, विजय सुतार, संध्या कोरे, मृणाल गावडे, विनोद गायकवाड, अमित पोटकुले, संभाजी नलवडे, लहू राठोड, आर जी कीर्तिकर, विश्वास केसरकर आदी उपस्थित होते.