महापौरांच्या प्रभागातच रस्त्यांची दुरवस्था...

<p>महापौरांच्या प्रभागातच रस्त्यांची दुरवस्था...</p>

कोल्हापूर - महापालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रभागातील रस्त्यांची अवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका शहरभर विकास कामांचे दावे करत असताना, महापौरांच्याच प्रभागात ऐन पावसाळ्यात चांगल्या स्थितीतील डांबरी रस्ते उकरून गॅस पाइपलाईनचे काम सुरू करण्यात आल्याने  नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

खड्डे, चिखल, उघडी मॅनहोल्स आणि विस्कळीत वाहतुकीमुळे  नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. महापौरांच्या प्रभागातच अशी अवस्था असेल, तर उर्वरित शहराची काय परिस्थिती असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

महापौरांच्या प्रभागातील सम्राटनगर परिसरातल्या नलवडे कॉलनीचा रस्ता पाहिला तर हा शहरातील रस्ता आहे की एखाद्या ग्रामीण भागातील डोंगराची पायवाट, असा प्रश्न पडतो. सर्वत्र चिखल, पाण्याने  भरलेले खड्डे आणि उखडलेले रस्ते अशीच या ठिकाणी परिस्थिती आहे. रोजच्या ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मार्केट यार्ड ते लोणार वसाहत या प्रमुख मार्गाचीही अवस्था काही वेगळी नाही. रस्ता कुठे संपतो आणि खड्डा कुठे सुरू होतो, हेच ओळखणे कठीण झाले आहे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.

वारे वसाहत, करवीर प्रांत कार्यालय परिसर आणि इतर भागांमध्येही गॅस पाइपलाईनच्या कामानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आले नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी मॅनहोल्स उघडे असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती वाढत आहे.