...अन्यथा क्षीरसागर यांना फाशी द्यावी : रविकिरण इंगवले
‘त्या’ व्हायरल व्हिडीओ संदर्भात महाविकास आघाडीचे कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरचे शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एका ठेकेदाराशी आर्थिक व्यवहाराची बोलणी करत असल्याचा एक व्हिडिओ दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतो. या व्हिडीओच्या अनुषंगाने ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार बैठक घेवून आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासंबधी व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कसून चौकशी करावी, अशी मागणी करत क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र आमदार क्षीरसागर यांनी हा व्हिडीओ एआयनिर्मित असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान आज ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेतली. यावेळी आमदार क्षीरसागर यांच्याशी संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओची सायबर शाखेमार्फत चौकशी करावी. कथित व्हिडीओच्या सत्यतेबाबत खातेनिहाय पडताळणी करून चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणावी आणि आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना रविकिरण इंगवले यांनी, नामदार चंद्रकांत पाटील हे आमदार राजेश क्षीरसागर यांची पाठराखण करत आहेत पण तो व्हिडिओ एआय निर्मित असेल तर नामदार चंद्रकांत पाटील यांनी मला फाशी द्यावी पण व्हिडीओ खरा असेल तर आमदार क्षीरसागर यांना फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाची अब्रू वेशीवर टांगण्याचे काम केले आहे, असा घणाघाती आरोप रविकिरण इंगवले यांनी केला आहे.
आमदार राजेश क्षीरसागर हे इतके बदनाम आहेत, की ते कोणत्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देखील होणार नाहीत. त्यांनी आता गोळा केलेली माया घेवून कोल्हापूर सोडून बाहेर जावे, अन्यथा कोल्हापूरची जनता पाठीमागे लागली तर आमदार क्षीरसागर यांना जगणे अवघड होईल, असा टोला देखील यावेळी इंगवले यांनी लगावला.
यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, अमर समर्थ, विनायक कारंडे, सचिन चौगुले, भैय्या खेडकर, सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक सुजय पोतदार, रीमा देशपांडे, विशाल देवकुळे, अनिता ठोंबरे, श्रद्धा महागावकर, दीपक गौड, राजू यादव, हर्षल पाटील, सागर साळोखे आदि उपस्थित होते.