अमित शहांच्या स्वागतासाठी फलकबाजी करताना महायुतीच्या नेत्यांनीच नियम बसवले धाब्यावर...

अमित शहांच्या स्वागतासाठी हेरिटेज पद्धतीच्या पथदिव्यांच्या खांबावरच  जाहिरातबाजी...

<p>अमित शहांच्या स्वागतासाठी फलकबाजी करताना महायुतीच्या नेत्यांनीच नियम बसवले धाब्यावर...</p>

कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी शहा यांच्या स्वागतासाठी शहरात मोठी फलकबाजी केली आहे. दोन वर्षापूर्वी कोल्हापुरात बसवण्यात आलेल्या हेरिटेज पद्धतीच्या पथदिव्यांच्या खांबावर जाहिरातबाजी करू नये, अशी वल्गना करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनीच त्या पथदिव्यांच्या खांबावर स्वागत फलक उभारले आहेत तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोरच स्वागत फलक लावून नियम स्वतः धाब्यावर बसवले आहेत.

दोन वर्षांपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरासह रंकाळा आणि अन्य ठिकाणी लाखो रुपयांचा निधी खर्च करून हेरिटेज पद्धतीचे पथदिवे उभारले आहेत.

कोल्हापुरात उभ्या केलेल्या हेरिटेज पद्धतीच्या पथदिव्यांच्या खांबावर कुणीही जाहिरातबाजी करू नये, असे आवाहन महायुतीतील लोकप्रतिनिधींनी केले होते. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी महायुतीच्या नेत्यांनी स्वतःच केलेले नियम धाब्यावर बसवले आहेत.

शहरातील काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोरच स्वागताचे फलक उभारून कॅमेरे झाकण्यात आले आहेत. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री येणार म्हणून पोलीस प्रशासन गेल्या आठ दिवसापासून सर्व खबरदारी घेत आहेत. मात्र महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर स्वागत फलक उभे करून सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत.