हक्काच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज स्वाभिमानीचे धरणे आंदोलन; राजू शेट्टी करणार नेतृत्व

<p>हक्काच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज स्वाभिमानीचे धरणे आंदोलन; राजू शेट्टी करणार नेतृत्व</p>

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची लेखी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली असतानाही, शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दि. १९ जून रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी करणार आहेत.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या अधिकृत माहितीनुसार जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, प्रशासनातील समन्वयाचा अभाव, अंतर्गत मतभेद आणि चुकीच्या नियोजनामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी सोडले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कडक उन्हाळा, अपुरा पाऊस आणि सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने अनेक ठिकाणी उभी पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासनाबरोबरच मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हक्काचे पाणी मिळावे, शेती वाचावी आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

"धरणात पाणी असताना शेतकऱ्यांच्या शिवारात का नाही?" हा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.