बंडखोर सेना पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील मिंगचे येथील राजकीरण लँडिंग चेंजेस इन अॅग्रीकल्चर आणि श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी-मेंढी पालन आणि उत्पादक सहकारी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप बंडखोर सेना पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
या आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचारा विरोधात आणि सभासद, पिग्मीधारक आणि ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. संबंधित प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात, आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, राकेश कांबळे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, राहुल देडे, ओम वाकसे, भालचंद्र दबडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पिग्मीधारक, ठेवीदार आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.