तुमच्यात धाडस असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा - खा. अरविंद सावंत यांचं बंडखोरांना आव्हान
नवी दिल्ली – आजच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीला सहा खासदारांनी अनुपस्थिती लावून पक्षात बंडखोरी केल्याचे निश्चित केले आहे. यावर पक्षाकडून या बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. येत्या 7 दिवसात त्यांनी या नोटीसीला उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर पक्षद्रोहाची कारवाई केली जाणार असल्याचे खा. अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.
खा. अरविंद सावंत यांनी म्हटले आहे कि, व्हीप लागू होत नाही असं म्हणनं हा अडाणीपणाचा कळस आहे. शेण खात आहेत खाऊ द्या, आता महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही, हा जो बाजार मांडला गेला आहे, त्यामुळं लोकशाही धोक्यात आली आहे. तुमची ओळख काय? शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी दिली. 2014 नंतर तुम्हाला कोणी मोठं केलं, तुम्हाला दोनदा उमेदवारी कोणी दिली ? आमचं पक्षचिन्ह घेऊन उभं राहिलात, मशाल घेऊन निवडून आलात, जनतेनं मशालीवर मतदान केलं. मतदारांनी आम्हा सगळ्यांना, निवडून आणलं. भाजपच्या, मिंध्यांच्या विरोधात 9 जणं निवडून आलो. तुमच्यात धाडस असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा,असं आव्हान त्यांनी बंडखोरांना दिले आहे.