उपसा बंदीविरोधात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामध्येच सुरु केलं ठिय्या आंदोलन

<p>उपसा बंदीविरोधात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामध्येच सुरु केलं ठिय्या आंदोलन</p>

कोल्हापूर - उपसा बंदीविरोधात शिरोळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामध्येच जोरदार ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील नदींच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याचा विचार करून उपसा बंदीचा आदेश लागू केला आहे. या उपसा बंदीमुळे नदीकाठी असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, शिरढोण, टाकवडे, तेरवाड, हेरवाड येथील शेतीचे मोठे नुकसान होत  आहे. यासाठी आज शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

पाणी आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे...उपसा बंदी तात्काळ मागे घ्या...अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी कार्यालय दणाणून सोडले. जोपर्यंत उपसा बंदी हटवत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

पंचगंगा नदी काठावरील इचलकरंजी बंधाऱ्यापासून ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंतचे पाणी पूर्णपणे प्रदूषित असल्याने या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात नाही. तसेच कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महानगरपालिका, विविध औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणारे केमिकल युक्त पाणी नदीत मिसळते. त्यामुळे या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नसताना जलसंपदा विभागाने उपसा बंदी लागू करण्याचे कारण काय असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या ठिय्या आंदोलनात सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.