तिसऱ्या विकास आराखड्यावरून राजकारण तापलं..!

कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तातडीने सभागृहासमोर सादर करावा : राजेश लाटकर

<p>तिसऱ्या विकास आराखड्यावरून राजकारण तापलं..!</p>

कोल्हापूर - शहराचा भविष्यातील चेहरामोहरा ठरवणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या महत्त्वाच्या आराखड्याची माहिती सभागृहासमोर का आणली जात नाही, असा सवाल सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला.

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी, प्रशासनाकडे याबाबत जाब विचारत आराखड्याचे तातडीने सादरीकरण करण्याची मागणी केली. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी विकास आराखड्यात बदल करण्याचा महापालिका सभागृहाचा अधिकार संपणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी विशेष सभा घेऊन आराखड्याची सविस्तर माहिती नगरसेवकांसमोर ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला सभागृहातूनही पाठिंबा मिळाला. विकास आराखड्याबाबत आतपर्यंत कोणतीही सविस्तर चर्चा न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकार संपल्यानंतर शासन स्तरावरून हवा तसा आराखडा मंजूर करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशीही चर्चा सभागृहात रंगली. अखेर हा विषय विशेष सभेत घेण्याचा निर्णय झाला.

महापौर आणि प्रशासनाने विशेष सभा घेण्यास तत्त्वतः मान्यता दिली असून त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या विकास आराखड्यावर आता खुली चर्चा होणार का, याची उत्सुकता वाढली आहे. शहराच्या विकासाचा रोडमॅप ठरणाऱ्या तिसऱ्या विकास आराखड्यावरून महापालिका सभागृहात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष सभेत हा आराखडा सादर झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असली, तरी आतापर्यंत नगरसेवकांना विश्वासात का घेतलं नाही, हा प्रश्न मात्र कायम राहिला आहे.