रामणवाडी ग्रामपंचायतीची नवीन इमारत गावाबाहेर ; ग्रामस्थांचा विरोध
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील रामणवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुरू असल्याने ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे.
ग्रामपंचायत ही गावकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित महत्त्वाची संस्था आहे. जन्म-मृत्यू दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्रे, कर भरणा तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायत इमारत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे. मात्र, नवीन इमारतीचे बांधकाम गावापासून दूर सुरू करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची नवी इमारत गावातच उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.