केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यावेळी अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त...
कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयित गुन्हेगार तसेच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने, कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. एक पोलीस अधीक्षक, 6 अप्पर पोलीस अधीक्षक, 20 पोलीस उपअधीक्षक, 64 पोलीस निरीक्षक, 142 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 1 हजार 368 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड, 8 क्यूआरटी पथक, 3 आरसीपी प्लाटून आणि 2 एसआरपीएफ कंपनी, असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून मंदिराच्या परिसरात श्वानपथकाच्या मदतीने संशयित वस्तू, बॅगा यांची तपासणी केली जात आहे. उद्या केंद्रीय मंत्री अमित शहांच्या हस्ते अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे.