बारा लाखाच्या चोरी प्रकरणी इचलकरंजीतील तिघांना अटक...
कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे बारा लाखाची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी इचलकरंजीतील तिघांना अटक करण्यात आली आहे.
चंदूर मधील संजय शिवगोंडा पाटील यांचे इचलकरंजीत टुलिंग दुकान आहे. दहा जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून सीएनसी - व्हीएमसी मशीनसाठी लागणारे महागडे टूल्स, कार्बाईन इन्सर्ट आणि अन्य साहित्य असा सुमारे १२ लाख ४५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले होते. याबाबत पाटील यांनी गावभाग पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे सांगली नाका परिसरात सापळा रचून अमर रमेश उपासे,ऋषिकेश बाबासो पाटील आणि कुलदीप चौधरी या तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत तिघांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी असा एकूण १० लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.