‘मोठा भाऊ आमचा पक्ष संपवू पाहतोय’ : शिंदेंच्या ‘या’ आमदारांची खदखद आली बाहेर
छत्रपती संभाजीनगर – मोठा भाऊ आमचा पक्ष संपवू पाहत आहे. जिल्ह्यात आमच्याबाबत अनेक घडामोडी घडत आहेत, निधी मिळत नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं काय होईल, अशी खदखद शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आ. सत्तारांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
यावर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, सोबत येऊन जर का, अशी वागणूक मिळत असेल तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात. नाराजी होती, म्हणून हे पाऊल उचलले. 2029 पर्यंत आमच्या नेत्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. काम करताना मित्रपक्षाकडून ज्या प्रकारच्या अडीअडचणी येतात, त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. आम्हाला वरिष्ठांकडून काही त्रास नाही, मात्र स्थानिक नेत्यांकडून आमची अडवणूक केली जाते आहे. हा त्रास बंद व्हावा, आम्हाला कुठेकुठे काय त्रास होतो हे सगळं सांगितले असल्याचे आ. अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.