उष्माघातामुळे ‘या’ डोंगरात गवा रेड्याचा मृत्यू
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील सादळे गावाच्या हद्दीतील जंगल क्षेत्रात गवा रेडा मृत अवस्थेत आढळून आला आहे. वनरक्षक विकास घोलप यांच्यासह वन मजुरांना सादळे परिसरात फिरत असताना गवा रेडा मृत अवस्थेत आढळून आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गवारेड्याची पाहणी केली तसेच गवारेड्याचा कशामुळे मृत्यू झाला हे पाहण्यासाठी काही नमुनेही घेण्यात आले आहेत. यावेळी प्रथम दर्शनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गवा रेड्याला पिण्यास पाणी न मिळाल्याने तो मृत झाल्याची माहिती दिली आहे.
जोतिबा डोंगर, सादळे - मादळे या परिसरात गव्यांचे कळप वारंवार जंगला बाहेर येत असतात. सध्या पाणी आणि चारा नसल्यामुळे भुकेलेल्या मुक जनावरांना उष्माघाताचा त्रास होत असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे ,वनपाल सागर कोळी, दिनेश तांबारे यांच्यासह वनमजूर उपस्थित होते.