बेवारस वाहनांचा लिलाव केल्याच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा : महाराष्ट्र क्रांती सेनेची मागणी

<p>बेवारस वाहनांचा लिलाव केल्याच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा : महाराष्ट्र क्रांती सेनेची मागणी</p>

कोल्हापूर -  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्या कार्यालयाला महाराष्ट्र क्रांती सेनेच्यावतीने निवेदन सादर करत जिल्हा पोलीस दलाने केलेल्या बेवारस वाहनांच्या लिलावाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

जिल्हा पोलीस दलाने २०२५ मध्ये ३८९ आणि सन २०२६ मध्ये ३४५ अशा एकूण ७३४ वाहनांचा एसओपी प्रणालीअंतर्गत लिलाव केला आहे. संघटनेने या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनधारक अथवा त्यांच्या वारसांचा शोध घेण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, आरटीओंकडून पडताळणी झाली का, न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती का, तसेच वाहनांना बेवारस घोषित करण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले, याबाबत पोलीस दलाकडून माहिती मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवाय वाहनांच्या मूल्यांकन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लिलावापूर्वी स्वतंत्र मूल्यनिर्धारक नेमण्यात आला होता का, बाजारभावाचा विचार करण्यात आला होता का आणि अंतिम लिलावातून किती महसूल प्राप्त झाला, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांची चोरीला गेलेली वाहने शोधण्याचे प्रमाण कमी असल्याचा आरोप करत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहन बेवारस घोषित होणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बेवारस वाहनांच्या लिलाव प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून पारदर्शकता, कायदेशीर पूर्तता आणि मूल्यांकन निकषांबाबतची सर्व माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेने केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील वाचक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

 यावेळी महाराष्ट्र क्रांती सेनेचे उदय लाड, संपत चौगुले, फिरोज शेख, संपत चौगुले, शामराव चौगुले, अशोक तिवारी उपस्थित होते.