गांधीनगर परिसरातील क्रिकेट बेटिंगसह विविध बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी
कोल्हापूर - गांधीनगरमधील २२ वर्षीय भावेश तुलसानी या तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर तो क्रिकेट बेटिंगमुळे कर्जबाजारी झाला होता का, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना आज निवेदन देण्यात आले.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची कापड बाजारपेठ असली तरी या परिसरात क्रिकेट सट्टा, गुटखा, मावा, गांजा, दारू विक्री, खाजगी सावकारी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान अनेक तरुण क्रिकेट बेटिंगच्या विळख्यात अडकत असल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित बुकी, सट्टा चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी, चोरी, मारामाऱ्या आणि अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भावेश तुलसानी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असले, तरी या घटनेच्या निमित्ताने परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांचे मूळ शोधून त्यावर प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. पोलीसांनी गांधीनगरमधील अवैध व्यवसायांवर वेळीच कारवाई केली नाही तर शिवसैनिक संबंधित ठिकाणी धाडी टाकतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, योगेश लोहार, सुनील पारपाणी, रामराव पाटील, जितू कुबडे, प्रकाश मुदुगुडे, दीपक ढिंग, वसंत पवार, बाळासो नलवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.