थकीत मानधनासाठी पंचायत समित्यांकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन...

<p>थकीत मानधनासाठी पंचायत समित्यांकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन...</p>

कोल्हापूर -  जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडील पाणी आणि स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यापासूनचे मानधन थकीत आहे. हातावचे पोट असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे मानधन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

 या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एक जून पासून बेमुदत काम बंद ठेवत जिल्हा जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन यासारख्या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम हे कंत्राटी कर्मचारी करत असतात. मानधन मिळावे, यासाठी याआधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा लेखी निवेदन देवून पाठपुरावा केला आहे. मात्र शासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत थकीत मानधनाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात मुकुंद घोंगडे, संतोष जाधव, राहुल जाधव, रणजीत पाटील, काशिनाथ कांबळे, संजय पाटील, उदय शिंदे, अनुप पाटील, पल्लवी महाडिक, माधुरी जाधव, सपना सावंत, अस्मिता यादव, गायत्री सरनाईक आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.