टिपर चालकांच्या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन ठप्प; आयुक्तांकडून २.२८ लाखांचा दंड

<p>टिपर चालकांच्या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन ठप्प; आयुक्तांकडून २.२८ लाखांचा दंड</p>

कोल्हापूर  : अॅटो टिपर वाहन चालकांनी अचानक काम बंद आंदोलन केल्यामुळे मंगळवारी शहरातील दैनंदिन कचरा संकलन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. एकाही अॅटो टिपरद्वारे कचरा उचलला गेला नसल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढिग साचण्याची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित एजन्सींवर आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी २५४ अॅटो टिपर वाहन चालक पुरविण्याची जबाबदारी सहा खासगी एजन्सींवर आहे. मात्र, मंगळवारी या एजन्सींकडील चालकांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शहरातील कचरा संकलनाची अत्यावश्यक सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.


या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित एजन्सींना जबाबदार धरले आहे. निविदेतील अट क्रमांक ३३ नुसार चालक उपलब्ध न केल्याबद्दल प्रति चालक प्रतिदिन ९०० रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानुसार २५४ चालकांच्या अनुपस्थितीबद्दल संबंधित एजन्सींवर एकूण २ लाख २८ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित एजन्सींच्या चालू देयकातून वसूल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, हा दंड चालकांच्या वेतनातून कपात करू नये, अशा स्पष्ट सूचना देखील महानगरपालिका प्रशासनाने एजन्सींना दिल्या आहेत. शहरातील स्वच्छता व्यवस्थेत कोणताही व्यत्यय सहन केला जाणार नाही, असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.


दरम्यान, चालकांच्या आंदोलनामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी अत्यावश्यक सेवेला वेठीस धरणाऱ्या कोणत्याही प्रकाराला प्रशासनाकडून कठोर उत्तर दिले जाईल, असे संकेत या कारवाईतून मिळत आहेत. महानगरपालिका प्रशासन आता पुढील काळात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पर्यायी उपाययोजनांवरही भर देत आहे.