डी. वाय. पाटील हॉस्पिटलसमोरील अतिक्रमणाविरोधात नागरिकांची तक्रार
परिसर कायमस्वरूपी ‘नो-हॉकिंग झोन’ घोषित करण्याची मागणी
कोल्हापूर : कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलसमोरील परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर पुन्हा बेकायदेशीर फेरीवाल्यांनी बेकायदेशीररित्या गाडया लावण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सागर तिम्माप्पा वडर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे निवेदन देऊन हा परिसर कायमस्वरूपी ‘नो-हॉकिंग झोन’ घोषित करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी माहिती अधिकारातून पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने १७ एप्रिल २०२६ दरम्यान मोठी कारवाई करून हॉस्पिटलसमोरील रस्ता मोकळा केला होता. मात्र, काही दिवसांतच फेरीवाल्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने रुग्णवाहिका, रुग्ण आणि नातेवाईकांना वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार रुग्णालय परिसराच्या १०० मीटर अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने हॉस्पिटलसमोरील परिसरात कायमस्वरूपी ‘नो-हॉकिंग झोन’चे फलक लावावेत, अतिक्रमणविरोधी विशेष गस्त पथक नियुक्त करावे तसेच पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास पूर्वीप्रमाणेच वाहतूक कोंडी व रुग्णसेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रश्नावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.