करवीर पोलिसांची मोठी कारवाई; १३.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; दोन आरोपी जेरबंद, वाईन शॉप चालकांवरही गुन्हा

<p>करवीर पोलिसांची मोठी कारवाई; १३.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त</p>

कोल्हापूर : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर धडक कारवाई करत तब्बल १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ४ लाख ५९ हजार ५७५ रुपयांची दारू आणि दोन वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित वाईन शॉप मालकांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

कळंबा येथे विदेशी दारूसह चारचाकी जप्त ...
गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार विजय पाटील व सोमराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कळंबा परिसरात सापळा रचण्यात आला. कळंबा नाक्याजवळील हॉटेल रानवारा समोर निस्सान टेरॅनो (एमएच १० बीआर ९७९७) या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी आरोपी शहाजी साताप्पा बरगे (वय ४८, रा. अर्जुनवाड, ता. राधानगरी) याच्याकडून ३१ हजार ७०० रुपयांची विदेशी दारू आणि वाहनासह एकूण ७ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाशी नाका येथे टेंपोतून देशी-विदेशी दारूची वाहतूक...
दुसऱ्या कारवाईत गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नवीन वाशी नाका परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी टाटा जीप एक्सेल टेंपो (एमएच ११ सीएच ४१५०) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी मुबीन अजीज शेख (वय २६, रा. शिवाजीनगर, पुलाची शिरोली, सध्या रा. बुध्याळकर नगर, कळंबा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख २७ हजार ८७५ रुपयांची दारू व टेंपोसह एकूण ६ लाख ३७ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई...
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजीत पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील आणि श्रीधर जाधव यांनी सहभाग घेतला.