जयसिंगपूरात बनावट तुपाची निर्मिती... तुकाराम मुंढेंची कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कारवाई 

<p>जयसिंगपूरात बनावट तुपाची निर्मिती... तुकाराम मुंढेंची कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कारवाई </p>

कोल्हापूर – जयसिंगपूर येथे बनावट तुपाची निर्मिती होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत  जयसिंगपूरमधील  बनावट तूप उत्पादन केंद्रावर छापा टाकला आहे. यावेळी सुमारे 1 लाख 78 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतरची कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली कारवाई आहे.

जयसिंगपूर येथे विनापरवाना तूप निर्मिती करण्यात येत असल्याची तक्रार  औषध प्रशासन कार्यालयाकडे आली होती. त्यानुसार  राहुल भाऊसो मगदूम यांच्या राहत्या घरी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक तपासणी केली. यात बनावट आणि  बेकायदेशीरपणे तूपाचे उत्पादन, साठा आणि विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अन्न सुरक्षा अधिकारी पी. के. घुगे यांनी तातडीने कारवाई करत म्हैस तूप व गाय तूपाचे एकूण ४ अन्न नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५९५ लीटरचा तूपाचा साठा जप्त करण्यात आला आहे.