राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महागाई विरोधात मूक आंदोलन
कोल्हापूर - सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत असून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि कडधान्यांच्या दरवाढीमुळे घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मूक आंदोलन केले. महागाईमुळे अन्न, वस्त्र आणि निवारा सारख्या मूलभूत गरजा भागवता येत नसल्याचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाण्यावरुन कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदन पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार, बाजीराव खाडे, गणेश जाधव, अपद्मजा तिवले, फिरोज सरगर, गणेश नलवडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.