कोल्हापूरला ‘महानगर प्रदेश’ दर्जा देण्याची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करावी, तसेच विविध विकासात्मक प्रकल्पांना मंजुरी द्यावी, या मागण्यांसाठी आज नायब तहसीलदार तथा गृह जनमाहिती अधिकारी नम्रता संजय चौगुले-शिराणे यांना निवेदन देण्यात आले. मागणीचे निवेदन एसफॉरयु ग्रुपने दिले आहे.
निवेदनात ७४ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी महानगर प्रदेश विकास आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. करवीर (पूर्व भाग), हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ आणि शाहूवाडी या तालुक्यांचा समावेश करून औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय रिंगरोड, काँक्रीट रस्ते, क्रीडा विद्यापीठ, आयटी हब, इलेक्ट्रॉनिक्स हब, पर्यटन हब, पुणे-कोल्हापूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, म्हाडा व सिडको गृहप्रकल्प, भिकाऱ्यांसाठी मोफत निवारा केंद्र, शेतकरी जनजागृती अभियान तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज सर्वधर्मीय स्मशानभूमी परिसरात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि भविष्यात कोल्हापूर ‘मेट्रो सिटी’च्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच या विषयावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांची बैठक बोलावून सविस्तर चर्चा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते एसफॉरयु ग्रुपचे राजू माने, प्रशांत मंडलिक, दत्तात्रय माने, रुपेश घडशी, प्रकाश टोपकर, प्रदीप दुगाणी आदी उपस्थित होते.