'लाडकी बहीण' योजनेसारखा 'कर्जमाफी'चा खेळ मांडू नका : राजू शेट्टी
कोल्हापूर – शेतकरी कर्जमाफी ही 'लाडकी बहीण' योजनेसारखी अत्यंत फसवी आणि जाचक अटींनी भरलेली योजना व्हायला नको, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
"शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिली जाईल, निर्णय होईल, कारवाई होईल, मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे घोषणा होणार नाही," हे मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
आचारसंहितेचे तांत्रिक कारण पुढे करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अधांतरी ठेवणाऱ्या महायुती सरकारविरोधात आम्ही अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकरी हा या राज्याचा कणा आहे, त्याला भिकेला लावू नका. जर ३० जूनपूर्वी राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरील कर्ज पूर्णपणे नील झाले नाही, तर हे सरकार आचारसंहितेच्या आड लपूनही वाचू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि या फसव्या कारभाराविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.