पगाराअभावी सकाळपासून टिपर चालकांचा बेमुदत संप; सर्व गाड्या ठप्प, २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

<p>पगाराअभावी सकाळपासून टिपर चालकांचा बेमुदत संप; सर्व गाड्या ठप्प, २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कचरा वाहतुकीचे काम करणाऱ्या टिपर चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सुमारे २०० चालक व कर्मचारी सहभागी झाले असून शहरातील जवळपास सर्व टिपर गाड्या ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंदोलक चालकांनी पगार वेळेवर न मिळणे, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) व कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआय) सुविधा न मिळणे तसेच किमान वेतनाचा लाभ न दिल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केले आहे. चालकांच्या म्हणण्यानुसार, वेतन देण्यासाठी कोणतीही निश्चित तारीख नसून गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनेक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत.

किमान वेतन कायद्यानुसार सुमारे २६ हजार रुपये वेतन मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १४ हजार ८०० रुपये पगार दिला जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. तसेच पीएफ व ईएसआयसारख्या मूलभूत सुविधा न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

पगार थकल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत वेतन अदा करावे आणि प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, सकाळपासून आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळताच टिपर ठेक्याशी संबंधित एका नगरसेवकाने आणि अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिल्याचे समजते. यावेळी काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

संपामुळे शहरातील कचरा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.