‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेवू नये – संजयकुमार सुद्रिक

<p>‘गोकुळ’च्या उत्पादनांचा दर्जा व गुणवत्ता कायम; अफवांवर विश्वास ठेवू नये – संजयकुमार सुद्रिक</p>

कोल्हापूर : गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ भारतीय मानकांनुसार उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण असून त्यांच्या गुणवत्तेचा हलाल प्रमाणपत्राशी कोणताही संबंध नसल्याचे गोकुळ दूध संघाच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून विविध समाजमाध्यमांवर गोकुळच्या दूध व दुग्धजन्य उत्पादनांबाबत अपुरी व चुकीची माहिती प्रसारित होत असून त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना सुद्रिक म्हणाले की, १९६३ पासून शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्राहकांच्या विश्वासावर उभी असलेली गोकुळ ही सहकारी संस्था ग्राहकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवत आहे.

गोकुळकडून FSSAI, ISO 22000, EIC आणि HACCP यांसारख्या अन्नसुरक्षा व गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन केले जाते. दूध उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळा हेच गोकुळचे बळ असून उत्पादनांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही, असे त्यांनी सांगितले.

हलाल प्रमाणपत्राबाबत स्पष्टीकरण देताना सुद्रिक यांनी सांगितले की, हे प्रमाणपत्र केवळ आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी तेथील आवश्यकतांनुसार घेण्यात आले होते. त्याचा गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्ता किंवा दर्जाशी कोणताही संबंध नाही.

ग्राहकांनी कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच गोकुळच्या उत्पादनांवरील आपला विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे समाजमाध्यमांवर संभ्रम निर्माण करणारे संदेश प्रसारित करू नयेत. यापूर्वी प्रसारित केलेले चुकीचे संदेश तात्काळ हटवावेत, अन्यथा गोकुळच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.